Tuesday, 21 October 2008

ग्रामस्थ दिनाचे शिल्पकार डॉ.संजय चहांदे Click here

२१ ऑक्टोबर, 2008 www.mahanews.gov.in
चौकटीत राहून चौकटीबाहेर काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची दखल घेणारे सदर. त्यांनी केलेले प्रयोग साधे वाटले तरी त्यातून साकारलेले विश्व आपणासही निश्चित प्रेरणादायी ठरेल.डॉ.संजय चहांदे हे नाशिक महसूल विभागीय आयुक्त म्हणून काम पाहतात. काही काळ त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक म्हणूनही काम पाहिले होते. त्यांची स्वत:ची एक कार्यशैली आहे. जे काम करायचं ते अत्यंत लोकाभिमुख. लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. शासकीय योजना लोकांपर्यंत जाण्यासाठी शासकीय यंत्रणेने कार्यकर्त्याची भूमिका घेतली पाहिजे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यातून रुजली 'ग्रामस्थ दिन'ची अभिनव संकल्पना. शासनाचा निर्णय नसताना केवळ नाशिक विभागासाठी योजना आणि त्याचे फलित, लोकांचे प्रश्न आणि शासनाने केलेली सोडवणूक याचा लेखाजोखा अगदी आमने-सामने प्रत्येक गावागावातून या माध्यमातून पुढे आला. यातून शासकीय अधिकार्‍याचे व कर्मचार्‍याचे प्रश्न कमी झाले आणि जनतेच्या तक्रारी कमी झाल्या. ग्रामस्थ दिन दिवसेंदिवस अपेक्षित परिणाम दाखवू लागले. विकासाचे नवे पर्व नाशिक महसूल विभागात सुरु झाले. गावातील प्रश्न नेमके काय आहेत, हे समजल्याने नियोजन करतांना या प्रश्नांचा विचार होत गेला. यंत्रणा कुठे कमी पडते आहे काय? हे समजले. त्यात सुधारणा करण्यास वाव मिळाला. पर्यायाने लोकांसाठी शासन ही भूमिका या माध्यमातून गावात रुजली.एक जानेवारी,२००७ पासून महिन्याच्या दर बुधवारी संपूर्ण विभागात ग्रामस्थ दिन राबविला जातो. ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक तसेच शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात. त्यांना ग्रामीण जीवनाची, समस्यांची जाण चांगली असते. पण समन्वयाचा अभाव असतो. त्यामुळे ग्रामस्तरावरील समस्या /अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्यात परस्पर समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने नाशिक विभागात 'ग्रामस्थ दिन' दर बुधवारी आयोजित केला जातो.शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या जबाबदारीच्या भूमिका स्पष्ट करणार्‍या कायद्यातील तरतूदींचे प्रभावी पालन व्हावे. तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये चांगला समन्वय प्रस्थापित व्हावा. विविध शासकीय सेवांचे वितरण व विविध कल्याणकारी योजनांचा फायदा खर्‍या लाभार्थीपर्यंत विना तक्रार मिळावा, त्याचा खुलेपणाने मासिक आढावा घेता यावा यासाठी 'ग्रामस्थ दिन' उपक्रम आहे.ग्रामस्थ दिनामध्ये ग्रामपातळीवरील सर्व विभागाचा आढावा व चर्चा होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारी मुक्ती योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महिला बचतगट, सर्व शिक्षा अभियान, पुरुष नसबंदी या आणि अन्य कार्यक्रमानुसार ग्रामीण लोकसहभागावर चर्चा व आढावा घेण्यात येतो. उपस्थित ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकुन त्या सोडविल्या जातात. दुसर्‍या टप्प्यात ग्रामस्तरावरील प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी ते देत असलेल्या सेवांचा तपशील, राबवित असलेल्या योजनांची माहिती व आपआपल्या कामकाजाचा आढावा ग्रामस्थ दिनात मांडतात. अधिकार्‍यांच्या कामकाजासंदर्भात अडचणी मांडल्या जातात. ग्रामपालक अधिकारी हे नोंदवून घेतात. लेखी तक्रारी, निवेदने असल्यास ती स्वीकारतात. हे सारे पहिल्या सत्रात होते. दुसर्‍या सत्रात उपस्थित गावकर्‍याच्या साक्षीने गावात असणार्‍या सर्व सरकारी विभागांना एकत्रित भेट दिली जाते. त्यात जिल्हा परिषद शाळा, रेशन दुकान, रॉकेल डेपो, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा समावेश असतो. या समस्या स्थानिक स्तरावर सात दिवसात सोडविणे अपेक्षित असते. तसे शक्य नसल्यास सक्षम अधिकार्‍यांकडे संबंधीत ग्राम अधिकारी पाठपुरावा करुन पुढील ग्रामस्थ दिनापूर्वी त्यावर आवश्यक कारवाई केली जाते.
नाशिक विभागातील ग्रामस्थ दिनग्रामपंचायतींची संख्या - ४८८६१ मे २००७ ते ऑगस्ट २००८ पर्यंत ग्रामस्थदिन - प्रत्येक गांवात ९ वेळा ग्रामस्थदिनग्रामस्थ उपस्थिती - १४ लाख ४ हजार ७४४अधिकारी-कर्मचारी उपस्थिती - ५७ हजार १२३प्राप्त तक्रारी -६४ हजार ६७७तक्रारींचे निराकरण - ६१ हजार ००८तक्रारींवर कार्यवाही सुरु - ३६६९ग्रामस्थ दिनामध्ये ग्रामस्थांचा वाढता सहभाग हा नोकरशाहीवरील जनतेचा अंकुशही ठरत आहे. या कार्यक्रमाचे संनियंत्रण त्रिस्तरीय पध्दतीने होते. विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर तहसिलदार हे ग्रामस्थ दिन कार्यक्रमाचे समन्वयक व संनियंत्रण अधिकारी म्हणुन काम पाहतात. डॉ. संजय चहांदे यांची ही संकल्पना नाशिक महसूल विभागात जानेवारी-२००७ ते मार्च-२००७ या तीन महिन्याच्या कालावधतीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार होती. पण संपुर्ण विभागात ग्रामपातळीवर याला मिळणार्‍या सहभागामुळे ही संकल्पना आता एका सामाजिक चळवळ झाली आहे. डॉ.संजय चहांदे ग्रामीण भागातून पुढे आले. भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविला. आपल्या प्रशासकीय अधिकाराचा उपयोग सर्वसामान्य माणसांकरिता करण्यात यावा, यासाठी नेहमीच त्यांचा अट्टाहास राहिला. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामस्थ दिन ही नवीन संकल्पना पुढे आली. जिल्हाधिकार्‍यापासून ते थेट तलाठ्यापर्यंत, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यापासून ते थेट ग्रामसेवकापर्यंत सारेच लोक कामाला लागले. त्याचा परिणाम दिसून आला. डॉ.संजय चहांदे खर्‍या अर्थाने ग्रामस्थ दिनाच्या संकल्पनेतून चौकटीबाहेरचे अधिकारी ठरले. 'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

1 comment:

  1. Anonymous21:21

    Namaste,
    I am S K More Tahasildar Indapur cerated SMS group on gupshup. Where we get free SMS and also sending one SMS u can send SMS to all members of group To Join this group Simply type JOIN Revenue_Officer and sent to 567678 from your mobile

    ReplyDelete

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...