Thursday 2 October 2008

जिल्ह्यातील १३ तहसीलदारांनी वाहने केली जमाजळगाव

जिल्ह्यातील १३ तहसीलदारांनी वाहने केली जमाजळगाव, ता. १ - जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना शासनाकडून देण्यात आलेली वाहनांसाठी दिला जाणारा निधी नऊ वर्षापासून प्राप्त झाला नसल्याने आज अखेर १३ तहसीलदारांनी आपली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात आणून जमा केलीत आहेत. जिल्ह्यात असलेल्या तहसीलदारांना शासनातर्फे शासनाची विविध कामे करण्यासाठी वाहने दिली आहेत. नैसर्गिक आपत्ती, विविध योजनांची गावोगावी भेटी देऊन जनजागृती करणे, शेती, रस्ता न्यायनिवाडा, तक्रारींचा गावावर जाऊन निपटारा करणे आदी कामे तहसीलदार ह्या वाहनांचा वापर करून करीत असतात. मात्र, या वाहनांना इंधनासाठी लागणार निधी तब्बल नऊ वर्षापासून या कार्यालयांना मिळाला नसल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात आहे. वारंवार मागणी करून अद्यापही निधी न मिळाल्याने आज सायंकाळी तहसीलदारांनी आपली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात आणून जमा केलीत. तहसीलदारांनी वाहने जमा केल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांना एक पत्र दिले. यात तहसील विभागाच्या अखत्यारित येणारे कुठलेही काम हे वाहन नसल्याने झाले नाही, अशी सबब ऐकून घेतली जाणार नाही. तसेच अत्यावश्‍यक कामे ही राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नमूद केले आहे. या संदर्भात तहसीलदारांच्या वतीने वाहनाशिवाय कुठलेही शासकीय काम राहणार नाही याची जबाबदारी आमची असेल. आम्ही शासकीय वाहनाशिवाय ती कामे पूर्ण करू असे आश्‍वासन तहसीलदार राहुल मुंडके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ----------------------------------- दोन तालुके वाहनाविना जिल्ह्यातील पंधरा तालुक्‍यांपैकी तेरा तालुक्‍यांना शासकीय वाहन आहे. यात पारोळा व बोदवड तालुक्‍याचा समावेश आहे. तसेच गेल्या वर्षी जिल्हाप्रशासनाकडून १७ नवीन वाहनांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. त्यापैकी अवघी तीन वाहने जिल्ह्याला मिळाली आहेत. तसेच सध्या असलेल्या वाहनांची अवस्थाही बिकट झाली आहे. ती वाहने वापरण्यापेक्षा खासगी वाहनाने गेलेले बरे असे तहसीलदारांना म्हणावे लागत आहे. ----------------------------------- २२ लाख रुपये थकीत जिल्ह्यात एकूण १९ शासकीय वाहने देण्यात आली आहेत. यात चार प्रांताधिकाऱ्यांचा समावेश आहे. १५ तालुक्‍यातील पारोळा व बोदवड तालुक्‍याने आपली वाहने गेल्या वर्षापासून जमा केली आहेत. शासनाकडून इंधनासाठी पैसा न मिळाल्याने तहसील विभागाची पेट्रोलपंपावरील पत संपली आहे. तहसील विभागाच्या वाहनात इंधन टाकण्यास चालक स्पष्ट नकार देत असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. दरम्यान, या १९ वाहनांना लागलेल्या इंधनाची २२ लाख २८ हजार ६७६ रुपयांची रक्कम शासनाकडून प्राप्त होणे बाकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. तालुकानिहाय इंधनाची थकीत रक्कम व कंसात वर्ष : जळगाव ३ लाख २ हजार ६८४ (१९९९ ते २००६), एरंडोल ९४ हजार ७४१(२००६ ते २००७), धरणगाव ६७ हजार ४५३ (२००१ते २००२), जामनेर ५३ हजार २९१ (२००३-२००४-०८), भुसावळ २५ हजार ६१७ (२००७-२००८), यावल १ लाख २९ हजार ५४५ (२००२-०२ ते २००६-०७), रावेर १ लाख ४ हजार ७५५ (१ एप्रिल ०७ ते ३० सप्टेंबर ०८), मुक्ताईनगर १ लाख ६३ हजार २१३ (२००१ ते ३१ जुलै ०७), बोदवड ९ हजार २७ (२००७), पाचोरा १ लाख ४४ हजार ७५३ (२०००-०१ ते २००६-०७), चाळीसगाव ५३ हजार २९० (२००७), भडगाव ९९ हजार ८६४(२००५-०६), अमळनेर ७९ हजार ५२५ (२००६-०७), पारोळा १ लाख ५८ हजार ४१५ (१९९९-२००० ते २००६-०७), चोपडा २ लाख ३१हजार ८५४ (२०००-०१ ते २००५- ०६), जळगाव प्रांताधिकारी १० हजार १४१ (२००६), भुसावळ प्रांताधिकारी ३ लाख ७ हजार ९६१ (२०००-०१ ते २००६-०७), अमळनेर प्रांताधिकारी ९५ हजार ४५७ (२००३-२००७), पाचोरा प्रांताधिकारी ९७ हजार ९० (२००१-०२ ते २००७-०८).

No comments:

Post a Comment

डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...