Saturday, 13 February 2021

कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल कलम ४३ मधील सुधारणा - हस्तांतरास कोणत्याही परवानगीची गरज नाही

पुणे: कुळ हक्काने मिळालेल्या जमीनी विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्याची तरतूद मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ मध्ये आहे.

कुळहक्काने मिळालेली जमीन जिल्हाधिका-यांच्या पूर्व मंजूरीशिवाय विक्री करुन, देणगी देऊन, अदलाबदल करुन, गहाण देऊन किंवा पट्टयाने देऊन हस्तांतरीत करता येत नाही. महाराष्ट्र राज्यात कुळकायदा अंमलात येते वेळी बहुतांशी मोठे जमीनदार हे प्रत्यक्षात शेतजमीनी कसत नव्हते, शेतजमीनी कसणा-या व्यक्ती वेगळयाच होत्या व त्यामुळे अशा कसणा-या व्यक्तींना संरक्षण देणे या सामाजिक हेतूने उपरोक्त तीनही कुळकायदे अंमलात आले आहेत व त्याअनुषंगाने सदरहू कायद्यात तरतुदी विहीत केलेल्या आहेत. आता महाराष्ट्रातील तीनही म्हणजे:

  • १) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३
  • २) हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ५० (ब)
  • ३) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम १९५८ चे कलम ५७

मध्ये खालील प्रमाणे दुरुस्ती केली आहे: "परंतु आणखी असे की, या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासून १० वर्षाचा काळ लोटला असेल, अशा जमिनींच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरीता, ती देणगी देण्याकरीता, तिची अदलाबदल करण्याकरीता, ती गहाण ठेवण्याकरीता, ती पटटयाने देण्याकरीता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरीता पुढील शर्तीस अधिन राहून, अशा कोणत्याही पुर्वमंजूरीची आवश्यकता असणार नाही-

  • (क) शेतजमीनीची विक्री करण्यापूर्वी, विक्रेता जमीन महसूल आकारणीच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम शासनाला देईल,
  • (ख) खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे,
  • (ग) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही, आणि
  • (घ) मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबतचा अधिनियम १९४७ यांच्या तरतूदीचे उल्लघंन केले जाणार नाही.

त्यामुळे आता कुळ खरेदी जमीन कोणत्याही मार्गाने हस्तांतरित करावयाची असेल तर केवळ वरील क, ख, ग, घ या अटींची पूर्तता करावी लागेल. हस्तांतरासाठी कोणतीही वेगळी परवानगी आवश्यक असणार नाही.

सुधारित तरतुद पाहता, कुळ कायद्यान्वये प्राप्त शेतजमीनीची विक्री करण्यापूर्वी संबंधित विक्रेता शेतकरी विक्री करावयाच्या जमिनीच्या, जमीन महसूल आकारणीच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम अदा करण्यास तयार /सहमत असेल आणि त्याकरीता तो तहसिलदार कार्यालयास अर्जाद्वारे कळविल. त्यावेळी तहसिलदार यांचेकडून जमा रकमांचे विहीत लेखाशीर्ष नमुद असलेले व विक्री करावयाच्या जमिनीच्या आकाराच्या ४० पट इतक्या रकमेचे, चलन दोन दिवसांत तयार करुन संबंधित शेतक-यास उपलब्ध करुन देण्यात येईल.

तसेच चलनात नमुद रक्कम संबंधित शेतकरी यांनी शासकीय कोषागारात भरणा करणे आवश्यक राहील. सदर रकमेचा भरणा केल्यानंतर चलनाची किंवा पावतीची प्रत संबंधित शेतकरी तलाठ्यास सादर करील. त्यानुषंगाने तलाठी संबधित शेतक-यांच्या ७/१२ उता-यावर नजराणा भरणा केल्याची उचित नोंद नियमातील तरतुदीप्रमाणे घेईल.

या नोंदीनंतर संबंधित शेतकरी उक्त परिच्छेद १ मधील अनुक्रमांक ख, ग, व घ मधील तरतुदीच्या अधिन राहून शेतजमीन विक्री करण्यास, व महसूल अधिनियम कलम ४२ब, क, ड प्रमाणे आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करून विकास आराखड्यातील अनुज्ञेय एन ए वापर करण्यास मुक्त राहील. प्रत्येक तहसीलदार यांनी त्यांचेकडील कुळ कायदा खरेदी प्रमाणपत्राचे रजिस्टर तपासून तालुक्यातील सर्व खरेदीदारांचे ७/१२ पाहून जमीन धारक कुळ खरेदीदारांना हे जाहीर नोटीसिने कळवून, विशेष अभियान अगर मोहीम चालवून पात्र धारकाकडून त्यांना चलन तयार करून देऊन ४० पट नजराणा भरून घेऊन लगेच तशा नोंदी तलाठ्यामार्फत घेऊन हे कुळ कायदा नियंत्रणाचे शेरे, व त्यामुळे जर वर्ग २ लिहिले गेले असेल तर ते कडून ७/१२ दिनांक १४/०८/२०१४ पूर्वी भारमुक्त करावा अशा सूचना आहेत. पुष्कळ ठिकाणी हे काम झाले आहे, अजूनही काही ठिकाणी अशी मोहीम चालू असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. या सुधारणाचा हेतू जमीनीचे प्रयोजन बदल करणे व हस्तांतर करणे सुलभ व्हावे व विकासाला गती मिळावी हा आहे. मात्र खूप वाचक अजूनही या मुद्यावरून खूप त्रास होतोय व त्यांची परवड होतेय असे लिहितात. म्हणून शासन आदेश सोबत जोडून (शासन आदेश वाचण्यासाठी क्लिक करावे), हा व्हिडीओ विधी साक्षरतेसाठी तयार केला आहे:

Wednesday, 2 December 2020

एनए परवानगीची खरच गरज नाही

पुणे: राज्यातील सर्व जिल्ह्यात विकास आराखड्याप्रमाणे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आता अकृषिक (एनए - नॉन अ‍ॅग्रीकल्चर) परवानगी घेण्याची गरज नाही. जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार, केवळ अकृषिकची आकारणी करून बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे. सदनिका बांधताना येणाऱ्या अडचणींमधून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी राज्य सरकारने गेल्या ६ वर्षापासून नियमावलीत शिथिलता आणली आहे. मात्र, यासंदर्भातील अंमलबजावणीबाबत महसूल विभागाचे अधिकारी, महानगर पालिका, नगरपालिका व नागरिकांमध्ये संभ्रम होता. बँकांकडूनही कर्ज देताना एनए परवानगीची विचारणा केली जात होती. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४२ब, ४२क आणि ४२ड मधील तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत. तथापि अजूनही नागरिक एन ए च्या बाबतीत सर्वत्र संभ्रम आहे असे बोलतात. यासाठी दि. १२ सप्टेंबर २०२० रोजी एक व्हिडीओ क्रमांक १० प्रसारित केला होता. त्यावरील प्रश्नांची चर्चा करणारा हा व्हिडीओ:


Monday, 23 November 2020

नवीन भूसंपादन कायदा २०१३

पुणे: १३ प्रकरणे, ११४ कलमी, ३ परिशिष्ट असणारा भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अमलात येऊन ७ वर्षे व्हायला आलीत. भूसंपादनाची गती मंद झालीय. या कायद्यातील भूसंपादन प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व बाधितांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. म्हणूनच संथ गतीने प्रवास सुरु आहे कारण व्यवस्थेला याची सवय नाहीये. बाकी काही का असेना, यामुळे ज्याची जमीन भूसंपादित होईल त्यांना मात्र वाजवी मोबदला, पुनर्वासन व पुनर्स्थापनेची हमी मिळणार आहे. चला समजून घेऊया ही प्रक्रिया कशी असणार या व्हिडीओमध्ये व पुढील नऊ भागांमध्ये ......

Wednesday, 28 October 2020

दक्षता जनजागृती सप्ताह 2020 - सतर्क भारत, समृद्ध भारत - Vigilant India, Prosperous India

पुणे : दक्षता जनजागृती सप्ताह 2020 : भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रशासनात सचोटी राखण्यासाठी सेन्ट्रल व्हीजीलंस कमिशन (सीव्हीसी) ही सर्वोच्च संस्था आहे. सन २००० पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह, Vigilance Awareness Week (व्हीएडब्ल्यू) साजरा केला जातो. दक्षता आयोगाचे निरीक्षण असे आहे की भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि लढण्यासाठी प्रोत्साहन देणारे सरकारी कर्मचारी किंवा जनता सर्व भागधारकांपर्यंत सक्रियपणे पोहोचले पाहिजेत. आयोगाचे असे मत आहे की भ्रष्टाचार ही एक गंभीर अनैतिक प्रथा आहे जी सार्वजनिक व्यवस्थेवरचा विश्वास आणि व्यवस्थेचा आत्मविश्वास कमी करते. प्रशासनातील सचोटीला प्रोत्साहन देऊनच जनतेचा विश्वास संपादन करणे ही चांगली रणनीती ठरू शकेल . म्हणूनच केंद्रीय दक्षता आयोग दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करतात . अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करणे आणि लोकसेवक आणि जनतेच्या वचनबद्धतेला पुष्टी देणे हा या संघटनेचा उद्देश आहे. भ्रष्टाचार हा आपल्या व्यवस्थेला झालेला कर्करोग आहे आणि देशाच्या जलद प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. या विरुध्द सर्व स्तरांवर निर्दयपणे लढा देण्याची गरज आहे (to ruthlessly combat corruption).

'सतर्कं भारत समृध्द भारत’ (Vigilant India Prosperous India) हा यंदाचा विषय आहे. प्रशासन प्रणालीत सुधारणा करण्याचा आणि मानक ऑपरेटिंग प्रक्रिया आणण्याचा सीव्हीसीच्या वतीने हा प्रयत्न आहे जेणेकरून भ्रष्ट व्यवहारांची व्याप्ती कमी करता येईल. ईमानदारी - एक जीवन शैली INTEGRITY - A WAY OF LIFE प्रतिज्ञा २०१६ मध्ये आयोगाने अखंडता ई-प्लेज ही संकल्पना सादर केली होती – एक नागरिकांसाठी आणि दुसरी कॉर्पोरेट्स, संस्था इत्यादींसाठी. आपण जरूर या लिंक वर क्लिक करून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रामाणिकपणा आणि सचोटीची उच्च पातळी गाठण्याचा संकल्प करावा.




Saturday, 24 October 2020

वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क | Equal Rights of Daughters in fathers property

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या Vineeta Sharma vs Rakesh Sharma या दिनांक ११ ऑगस्ट २०२० च्या क्रांतिकारी निर्णयाने स्री-पुरुष समानतेच्या दिशेने महत्वाचा प्रवास सुरु झाला आहे. “मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क दिलेच पाहिजेत. मुलगा हा लग्न होईपर्यंत मुलगा असतो. मात्र मुलगी आयुष्यभर एक प्रेमळ कन्या असते. “A son is a son until he gets a wife. A daughter is a daughter throughout her life” असे म्हणत वडील जिवंत असोत वा नसोत, मुलगी आयुष्यभर समान भागीदार (कोपार्सनर) राहील” असे स्पष्ट करीत हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा 2005 हा 9 सप्टेंबर 2005 रोजी अस्तित्वात आला. त्यावेळी वडील हयात होते किंवा नव्हते, त्याने फरक पडणार नाही. 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. दिनांक २० डिसेंबर २००४ पर्यंत ज्या अविभक्त कुटुंबाच्या मिळकतीचे नोंदणीकृत वाटणीपत्र झाले नसेल अशा सर्व मिळकतीत मुलीना मुलासारखा समान हक्क मिळेल. मात्र दिनांक २० डिसेंबर २००४ पूर्वी अविभक्त कुटुंबाच्या मिळकतीचे जर नोंदणीकृत वाटणीपत्र झाले असेल किंवा न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार वाटणी झाली असेल, तर मात्र कायद्याने नव्याने निर्माण झालेला घटक म्हणून मुलीस प्राप्त होणाऱ्या अधिकाराचा अशा वाटणीवर काहीही परिणाम होणार नाही किंवा वाटणीला बाधा येणार नाही असेही न्यायालयांने स्पष्ट केले आहे.

Monday, 31 August 2020

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १५८ च्या पोटकलम १ अन्वये स्थावर मालमत्तेवर आकारण्यात येणारा अधिभार

 महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १५८ च्या पोटकलम १ अन्वये स्थावर मालमत्तेवर आकारण्यात येणारा अधिभार

"स्थावर मालमत्तेची विक्री, दान आणि फलोपभोगी गहाण यासंबंधीच्या संलेखांवर मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ (१९५८ चा ६०) अन्वये लादण्यात आलेले मुद्रांक शुल्क, कोणत्याही जिल्हा परिषदेच्या अधिकारितेत असलेल्या स्थावर मालमत्तेवर परिणाम करणा-या आणि राज्य शासन याबाबतीत शासकीय राजपत्रात प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेद्वारे जी तारीख विनिदिष्ट करील त्या तारखेस किंवा त्या तारखेनंतर करुन देण्यात आलेल्या, संलेखांच्या बाबतीत, अशा प्रकारच्या असलेल्या मालमत्तेच्या मुल्यावर आणि फलोपभोग गहाणाच्या बाबतीत, संलेखांत नमूद केल्याप्रमाणे संलेखाद्वारे प्रतिभूत असलेल्या रकमेवर, एक टक्क्याने वाढविण्यात येईल.”

“ परंतू,जेव्हा राज्य शासन,महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम,च्या कलम ९ याच्या खंड (अ) अन्वये नियमाव्दारे किंवा आदेशाव्दारे,स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री, दान आणि फलोपभोग गहाण यासंबंधीच्या संलेखांवर, उक्त अधिनियमान्वये आकारणी योग्य शुल्क कमी करण्याचे किंवा सुट देण्याचे ठरवील,तेव्हा असे शुल्क कमी करणे किंवा सूट देणे हे, या पोट कलमान्वये आकरावयाच्या जादा शुल्काच्या बाबतीत देखील लागू असेल"

उपरोक्त तरतूद विचारात घेता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा दि.१ सप्टेंबर, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीकरिता शून्य टक्के तर दि.१ जानेवारी, २०२० ते दि. ३१ मार्च, २०२१ अर्धा टक्का करण्यात येत आहे.

संदर्भ: महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः झेडपीए २०२०/प्र.क्र.४४/पंरा-१ तारीख:-२८ ऑगस्ट,२०२०.

 

Sunday, 30 August 2020

दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता दोन टक्केने तर, दिनांक १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या आणि दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता मुद्रांक शुल्क दिड टक्केने कमी

 पुणे :  मुद्रांक अधिनियम अधिसूचना क्रमांक मुद्रांक-२०२०/प्र.क्र. १३६/म-१ (धोरण).-महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा ६०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, लोकहितार्थ तसे करणे आवश्यक असल्याची महाराष्ट्र शासनाची खात्री पटल्यामुळे, महाराष्ट्र शासन, याद्वारे, कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीकरारपत्राच्या दस्तऐवजांवर उक्त्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची १ च्या अनुच्छेद २५ च्या खंड (बी) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क, दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता दोन टक्केने तर, दिनांक १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या आणि दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता दिड टक्केने कमी करीत आहे.


डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ - सूचना, हरकती व आक्षेप

पुणे: केंद्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल २०२२ हे प्रारूप विधेयक प्रसिद्ध केले असून त्यावर फ...